वेब व्हर्जन

मोबाईल व्हर्जन पेक्षा वेब व्हर्जन मध्ये जास्त छान दिसते.

Friday, 12 February 2021

पेठ सदाशिव

  

सदाशिव पेठेतील माझी  पहिली आठवण  म्हणजे मी आमच्या वाड्याच्या दरवाज्यात  उभे राहून इकडे तिकडे बघतोय. साधारण पाच वर्षांचे वय उंची जेमतेम अडीच फूट असावी, त्यामुळे आसपासची माणसं काय, जनावर काय, वस्तू काय, सगळेच माझ्यापेक्षा टोलेजंग. मी राहायचो  त्या गल्लीला अनेक नावे होती. टिळक रोडची   गल्ली म्हणून तिला टिळकवाडी  म्हणायचे. टिळक रोड क्रॉस केला की समोर येणाऱ्या भागास चिमणबाग म्हणायचे. खरं म्हणजे चिमणबाग  ही अजूनही एक मोठी चाळ आहे  आणि मग बाकीचे बंगले, वाडे तेथे आहेत पण त्या भागाला सगळे मिळून  चिमणबागच म्हणतात. उजव्या हाताला रावबहाद्दूर गडकरी यांचा टुमदार बंगला होता रावबहाद्दूर यांच्या इतिहासाबद्दल मला काही माहीत नाही, पण ते उग्र  दिसणारे पण तसे प्रेमळ असं व्यक्तिमत्त्व होतं.  त्यांच्या घरावरून जाणारा हा चिमणबागेचा रस्ता  टिळक रोड क्रॉस करून आमच्या गल्लीत यायचा अगदी डॉक्टर गो.रा. परांजपे यांच्या घरापर्यंत. राव बहाद्दूर गेल्यानंतर त्याला  महानगरपालिकेने रावबहाद्दूर गडकरी पथ असं नाव  दिल. आता त्याला काय म्हणतात माहिती नाही. 


आमच्या वाड्याच्या पूर्वेला म्हणजे समोरच पेरूगेट  मुलांची भावे स्कूलचे  मोठेच  मोठे ग्राउंड,  त्याला तारेचे कंपाउंड. अर्थात याला काही अर्थच नव्हता. आमच्या इथे सगळेच विद्यार्थी  तारेच्या कुंपणाच्या भोकातून जायचे शाळेत. खर   म्हणजे मुख्य दार दुसरी  कडेच होते  टिळकवाडी च्या दोन टोकांना दोन विजेचे खांब  आणि एक  मध्ये, म्हणजे आमच्या वाड्यापाशी, त्यावर चाळीस   वॅटचे  मीणमिणते दिवे.  संध्याकाळी ते दिवे पेटत पण फारसा उजेड पडत नसे, त्याची गरज ही नसायची  कारण संध्याकाळी साडेसहा नंतर  सगळीच रहदारी  हळूहळू मंद व्हायची


पुण्याची सदाशिव पेठ म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या चर्चेचा विषय! कधी कुतूहल कधी हेटाळणी कधी हेवा,  अशा अनेक भावना लोकांच्या मनात आहेत कारण काय ते कळत नाही. आहे मात्र  खरं. मग तुमच्या मनातल्या भावना कशा आहेत, त्यावर तुम्ही सदाशिव पेठवर असे विनोद करणार आणि स्वतःच पोट धरून हसणार. सदाशिव पेठेत राहिलेल्या किंवा राहणाऱ्या कुणालाही तुमच्या विनोदांचा काहीही फरक पडत नाही कारण त्यांना माहिती आहे सदाशिव पेठी असणं म्हणजे काय!


आता तुम्हाला माहिती असेलच की पेशव्यांनी  जेव्हा  ही पेठ वसवली तेव्हा आपल्या ज्येष्ठ काकांचे नाव - सदाशिवराव भाऊंचे नाव या पेठेला दिले. इतिहासात डोकावले तर सदाशिवराव भाऊ म्हणजे बुद्धिमान, उत्तम तारतम्य बाळगणारे, सम्यक  वृत्तीचे  आणि आपण बरे आणि आपले काम बरे अशा स्वभावाचे गृहस्थ होते. आता आपण सदाशिव पेठेत राहणाऱ्या लोकांचे  स्वभाव बघितले तर  सदाशिवराव भाऊंच्या स्वभावाची ते अगदी  मिळते जुळते असतात.  कदाचित हे स्वभाव पुण्यातल्या इतर  पेठातील रहिवाशांमध्ये  अभावानेच आढळत असतील आणि त्यामुळेच पेठ सदाशिव महाराष्ट्रातच नव्हे तर जगातील सर्व मराठी बांधवांच्यात   ख्यातकीर्त  झाली असावी असे वाटते.


मी भाग्यवान, माझा जन्मच मुळी सदाशिव पेठेत  झाला. आता त्या वेळेला न कळत्या वयात आपण सदाशिव पेठेत जन्मलो ह्याचं अप्रूप अजिबातच नव्हत.  ते अप्रूप  मोठे झाल्यावर इतरांनी जाणवून दिलं आणि मग कळल की आपला जन्म आणि नंतर चाळिशीपर्यंत  सदाशिव पेठेत वाढणं  हे किती महत्त्वाचं होतं ते.


लहानपणापासून जवळ जवळ महाविद्यालयात  जाईपर्यंत  आजूबाजूचे भवताल तुमच्यावर खूप संस्कार करते, त्यातील तुमची शाळा ही महत्त्वाची पण त्याचबरोबर तुमच्या राहण्याच्या  आसमंतात कोण राहतं हे पण महत्वाचे. माझ्या जडणघडणीच्या काळात म्हणजे साधारण १९६० ते १९८० या काळात आजूबाजूला पुण्यातील  महत्त्वाच्या व्यक्ती राहत असत अर्थात आम्हाला त्याची तेव्हा जाणीव नव्हती  कारण ही मंडळी मोठी असली तरीसुद्धा दररोजच भेटत असल्यामुळे त्यांच्याबद्दल वेगळे काही जाणवत नसे पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आमच्यावर झाल्याशिवाय राहिला नाही




स्वगत

नेहमीप्रमाणे सकाळचे आठ वाजले होते , अगदी काल वाजले तसे किंवा उद्या वाजतील तसे. केकाटणाऱ्या सिलोन वर पद्मिनी   परेराने आपल्या नाजूक आणि आर्...