वेब व्हर्जन

मोबाईल व्हर्जन पेक्षा वेब व्हर्जन मध्ये जास्त छान दिसते.

Thursday, 28 October 2021

दुसरे दशक

 

दुसरे दशक

 

सिंहावलोकन, किती छान शब्द आहे!  आयुष्याच्या सहाव्या दशकात आल्यावर बरेच पाठीमागे गेलेले दुसरे दशक वळून बघायचं म्हणजे एकदम वेगळेच वाटते.  माझा जन्म १९५५  सालामधला. पहिल्या पाच वर्षाच्या आयुष्यात आपण काय होतो ते आठवत नाही.  १९६० साली भावे प्राथमिक शाळेत गेलो तो पहिला माझा सार्वजनिक वावर. त्यानंतर १९६१ ते १९७०१९७१  ते १९८०, १९८१ ते १९९०वगैरे वगैरे, अशी पाहता पाहता  सहा दशके गेली. त्यातलं सर्वात संस्मरणीय दशक म्हणजे १९७१ ते १९८०  म्हणजे वय वर्षे १५ ते वय वर्ष २५!

 

आपण कोण होणार याची शाश्वती नसताना मोठी मोठी स्वप्ने बघण्याचा तो  काळ.  महत्त्वाकांक्षा, संधी आणि कार्यक्षमता यांचा एकमेकांशी काही संबंध असतो याची आपल्याला  कल्पनाच नसते. डोक्यात फक्त असते ती फक्त महत्त्वाकांक्षा. आपल्याला एखादी गोष्ट जमेल की नाही त्याचा हिशोबच  नसतो. माझं पण असंच झालं. शाळेतल्या हवाईदलाच्या एनसीसीत असल्यापासून हवाईदलामध्ये जायचं हे मी मनोमन नक्की केलं होतं; पण त्यासाठी काय करावं लागतं. काय नाही काही माहिती नव्हतं. घरामध्ये आईला असं वाटत होतं   की सैन्यात जायचं  म्हणजे  फक्त मरायला! वडील डिफेन्स अकाउंटस मध्ये होते तरी त्यांचे असे  काहीच मत नव्हतं; मोठ्या भावाला वाटायचं मी त्याच्यासारखं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर व्हाव आणि त्याच्यासारखंच भाभा अणुशक्ती केंद्रात किंवा तत्सम सरकारी  प्रयोगशाळेत चिकटून जाव. एकंदरीत काय मी सैन्यात जाण्यासाठी घरून काहीच प्रेरणा नव्हती. त्यामुळे काय झालं की आपला देश एका भविष्यकालीन एअर चीफ मार्शलला मुकला! 

 

अर्थात त्याचे इतरही परिणाम झाले मुख्य म्हणजे इंटरला अपेक्षित मार्क मिळाले नाहीत त्यामुळे पुण्याच्या ऐवजी गोव्यातील फार्मागुडी  येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळत होता; पण वडीलांची निवृत्ती पुढच्याच वर्षी होती.  त्यामुळे ते म्हणाले की जे काय दिवे


लावायचे ते पुण्यातच लावा.  मग शांतपणे गरवारे महाविद्यालयात द्वितीय वर्ष शास्त्र शाखेला प्रवेश घेतला आणि भौतिकी विज्ञान, रसायन शास्त्र आणि गणित असे तीन विषय घेतले. पुढच्या वर्षी म्हणजे शेवटच्या वर्षी गणित नको वाटल, रसायनशास्त्राची घाण वाटायची म्हणून  भौतिकी विज्ञान घेतले आणि त्यात पहिल्याच प्रयत्नात पदवीधर झालो. पण डोक्यातले हवाईदलाचे खूळ गेले नव्हते. त्यामुळे डायरेक्ट एन्ट्री ह्या हवाईदलाच्या योजनेनुसार वाराणशीला जाऊन एकदा जनरल ड्युटी पदासाठी तर  एकदा वैमानिकासाठी परीक्षा दिली. घरच्या अप्रेरणादायी वातावरणामुळे जे व्हायचे तेच झाले. तिसऱ्यांदा म्हैसूरला वायुदलात हवामान शास्त्रज्ञ म्हणून मुलाखतीसाठी बोलावले होते; पण पुण्यातील हवाईदल निवृत्त विंग कमांडर देशपांडे यांनी जाऊ नको असा सल्ला दिला म्हणून मुलाखतीला सुद्धा गेलो नाही.

 


आता एकच मार्ग राहिला म्हणजे भौतिकी विज्ञानात पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदवी म्हणजे एमएससी करणे. त्याप्रमाणे दोन वर्षात भौतिकीविज्ञनात आणि त्यात इलेक्ट्रॉनिक्स हा विशेष विषय घेऊन एमएससी झालो. सरकारी नोकरीचे खूप प्रयत्न केले, पण नशीबात नव्हते. शेवटी भावाच्या ओळखीने पुण्यात  चित्रशाळेपाशी असलेल्या एका लघु इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात  अडीच वर्षे पाट्या टाकल्या; खूप अनुभव मिळाला. अगदी सर्किट डिझाईन पासून ते मेंटेनन्स पर्यंत. साखर उद्योगाला लागणारे इलेक्ट्रॉनिक मशीन हा माणूस बनवत असे. त्यामुळे त्याने मला गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू,   कर्नाटक अशा सगळ्या राज्यांत - जेथे जेथे साखर कारखाना असेल  तेथे तेथे - अशा सुमारे २५० साखर कारखान्यात फिरवले. त्यावेळी रेल्वेत आरक्षणाची पद्धत फारशी नव्हती; शिवाय सर्व साखर कारखाने आत कुठेतरी खेडेगावात, रस्ते जवळजवळ नसल्यासारखेच, एसटी चा भीषण प्रवास, त्यामुळे त्या अडीच वर्षात मी अगदी थकून गेलो.

 


तोपर्यंत १९७९ साल आले होते.आणि मग नशीब पालटायला सुरुवात झाली मुंबईच्या प्रख्यात जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रथमच इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर भरती करायचा ठरवला आणि मी त्याला पात्र ठरलो. मी त्यांच्याकडून कबूल करून घेतलं होतं की एक वर्षाच्या प्रोबेशन नंतर ते मला दिल्लीच्या आय आय टी मध्ये बायोमेडिकल इंजीनियरिंग एमटेक कोर्सला त्यांच्या खर्चाने पाठवतील. त्याबदल्यात मी एमटेक झाल्यावर जसलोकमध्ये पाच वर्ष नोकरी करायची. पण आपण ठरवतो एक आणि होतं एक. दहा महिने झाल्यावर अचानक मुंबईचाकामगारनेता" डॉ दत्ता सामंत याच्या नेतृत्वांने जसलोक हॉस्पिटलमध्ये साडेतीन महिन्याचा संप झाला. मेडिकल, पॅरामेडिकल आणि टेक्निकल म्हणजे मी असं स्टाफ संपामध्ये सहभागी नव्हते. मुख्यतः क्लास तीन आणि चार हे सहभागी होते. पण त्यांनी आम्हाला सर्वांना धमकी दिली की, तुम्ही आत जाऊनच बघा की तुमचं  तंगड तोडतो.  आणि आमच्या एका पॅथॉलॉजी आणि एक्स-रे ऑफिसरच्या बद्दल त्याने ते करून दाखवल. आमची पॅथॉलॉजी ऑफिसर पद्मा अय्यर ही नंतर १९८४ पर्यंत कोमातच होती असं मी ऐकलं, पुढं काय झालं मला माहिती नाही.

 

याचा परिणाम असा झाला  की जसलोकची छान नोकरी  आणि दिल्ली आयआयटीमध्ये एमटेक करायचं स्वप्न हे दोन्ही बोम्बलल.  हातात पैसे नाहीत त्यामुळे मुंबईत राहणार कसं? पुण्याला परतलो.   तो काळ असा होता की भारतामध्ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स विषयाची सुरुवात होती. काही ठराविकच मोठे उद्योग धंदे होते की ज्याच्या मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर भरती व्हायचे. अर्थात महाराष्ट्रातल्या पाच इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि पाच विद्यापीठे यातून फक्त दोनशे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर बाहेर पडायचे पण त्यांनाही नोकरी मिळायची नाही.  माझं सुदैव एवढं की १९७९ च्या  डिसेंबरमध्ये ओळखीने मला मुंबईच्या  एका डेन्मार्क स्थित (डॅनिश) कंपनीत नोकरी लागली आणि माझी गाडी परत रुळावर आली. नंतर कदाचित माझ्या कामामुळे असेल पण त्यांनी पुण्याला एक शाखा काढायची ठरवली आणि मी मुंबईच्या पगारावरच परत पुण्यात आलो. इलेक्ट्रॉनिक्स  मधील तांत्रिक भाग म्हणजे डिझाईन, प्रोडक्शन, इंस्टॉलेशन व  कमिशनिंग कधीच मागे पडले होते  आणि आता मी डॅनिश कंपनीसाठी पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्स प्री सेल्स, मार्केटिंग, प्रमोशन, वगैरे वगैरे यामध्ये कारकीर्द करायची ठरवली.

 

लवकरच माझ्या लक्षात आलं मी जरी इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या विक्री व्यवसायात  असलो  तरी मार्केटिंग मॅनेजमेंटची कुठलीही डिग्री किंवा शिक्षण माझ्याकडे नाही. म्हणून मी पुणे विद्यापीठाचे संध्याकाळचे डीबीएम-एम एम एस मध्ये प्रवेश घेतला; अर्थात तोपर्यंत पुढचे दशक उगवले होते

 

 १९७१ ते १९८०  हा प्रवास अतिशय थरारक असा झाला. आपण योजायचे एक आणि व्हायचे भलतेच! या काळामध्ये झालेल्या अजून एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करायला हवा. १९६० पासून ते १९७१ पर्यंत आम्ही केवळ मुलांच्या शाळेत होतो. मुलींचा जवळ-जवळ संपर्कच नाही. माझी मोठी बहीण माझ्यापेक्षा जवळ जवळ एक तपाने  मोठी असल्यामुळे तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्याताई”  होत्या! या पार्श्वभूमीवर गरवारे महाविद्यालयात भेटलेल्या राजू, सुनितासारख्या सुंदर मैत्रिणींनी ते दिवस अतिशय सुंदर केले. नंतर पुणे विद्यापीठात तर सहशिक्षण होते पण तिथे चांगल्या अशा मैत्रिणी झाल्या नाहीत. कंपनीमध्ये मात्र खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. जसलोक मध्ये मंगल मुळे, सिस्टर आयरिन डिसिल्व्हाडॅनिश कंपनीत  विशेषतः टीना मोतीवालाबेलींडा मेंझिस, फातिमा फर्नांडिसपुष्पा सलढाणाया मुलींनी माझ्यात पूर्वी कधीही नव्हता एव्हढा आत्मविश्वास निर्माण केला. सेल्स आणि मार्केटिंग मॅनेजमेंटला लागणारा सभाधीटपणा, पब्लिक स्पिकिंग आणि भिन्नलिंगी व भिन्न संस्कृती मधल्या सहकाऱ्यांशी कसं बोलावं व वागाव याचं शिक्षण त्यांनी मला दिलं आणि त्यामुळेच पुढच्या काही दशकात मी माझ्या कार्यक्षमतेत वाढ करू शकलो आणि विभिन्न संस्कृतीच्या सहका-यांचे नेतृत्व करून  यशस्वी होऊ शकलो.

 

या दशकात माझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल होतील अशा अजून तीन घटना घडल्या - एक म्हणजे मी गरवारे महाविद्यालयात सायन्स असोसिएशन आणि फिजिक्स असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी झालो. तसेच महाविद्यालयाच्या शेवटच्या दोन वर्षात गरवारे कॉलेजच्या तालमीत (त्यावेळी तालमीला जिम म्हणत नसत) आणि टिळक टँक वर सकाळ संध्याकाळ पडिक असे. त्यामुळे तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाली आणि त्यावेळी मिळालेली शक्ती अजूनही पुरते आहे.  अजून एक गोष्ट अशी की कदाचित आपले मराठीचे मास्तर तीर्थरूप श्री वा कुलकर्णी यांचा प्रभाव म्हणा, मी गोष्टी आणि कविता लिहायला लागलो. प्रत्येक वर्षाच्या वार्षिक अंकात माझी काहीतरी कथा किंवा कविता असायचीच. गरवारे महाविद्यालयात असताना कला शाखेच्या तीन विद्यार्थांच्या बरोबर मिळून मीदूतनावाचे त्रैमासिक आणिपिपाणीनावाचे भिंतीवरचे हस्तलिखित-अनियतकालिक संपादन करून प्रकाशित करत असे. (पिपाणी च्या संपादकाला "पिम्पाद्क" म्हणत!) पण महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील ते फुलपंखी दिवस संपले आणि  कलालेखन सुद्धा.  

 

तर असं हे दशक माझ्या व्यक्तिमत्त्वावर सर्वांगाने परिणाम करणारे! १९७१ ला शाळेतून पांढरा हाफ शर्ट खाकी हाफ चड्डीवर बाहेर पडलेला मी आणि १९८० ला डॅनिश कंपनीत सुटाबुट-टायमध्ये असलेला मी हे दोन्ही वेगळे होतो!

 


No comments:

Post a Comment

स्वगत

नेहमीप्रमाणे सकाळचे आठ वाजले होते , अगदी काल वाजले तसे किंवा उद्या वाजतील तसे. केकाटणाऱ्या सिलोन वर पद्मिनी   परेराने आपल्या नाजूक आणि आर्...