माझा सिगारेट प्रवास
माध्यमिक
शाळेतून बाहेर पडलं की खूप क्षितिजे खुणावत असतात. पंधरा सोळा वर्षांच वय आणि
त्यातून तुम्ही जर फक्त मुलांच्या शाळेत असाल तर मग मुलींच्या बरोबरच्या सहशिक्षणाची
गंमत वेगळीच. आमच असंच झालं. पुरुषार्थ
दाखवण्याच्या विविध हिकमती त्यावेळेला सर्वच मित्र दाखवायचे, त्यातले एक म्हणजे दाढी
मिशी. माझ्या आठवणी प्रमाणे शाळेमध्ये फक्त मी
आणि श्रीनिवास पुंडले अशा दोघांनाच शाळा सोडायच्या आधी भरपूर दाढी आणि मिशी आली होती. मला तर मित्र अस्वल्या म्हणायचे. त्यामुळे मी जरा वयाच्या मानाने थोराड
दिसायचो. त्यातून
तेव्हा सैन्यात जायचे वेड लागले होते त्यामुळे तालमीत जाणे वगैरे
उद्योगही करत असे. ब-याच नातेवाईकांना असे वाटे की मी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात नसून
दुसऱ्या-तिसऱ्या
वर्षात असेन.
२२ जानेवारी
१९७२ रोजी माझ्या भावाचं लग्न झालं. आमच्या वहिनी इंदूरच्या. त्यावेळी पुणे-इंदूर अशी कुठलीच आगगाडी नव्हती आणि बस
पण नव्हती. जाताना
आम्ही खांडव्यापर्यंत आगगाडीने गेलो आणि तिथून मग बसने. येताना मात्र इंदूर-नाशिक या एसटीने आलो. पुण्यापर्यंत थेट एसटी नव्हती. सकाळी इंदूरला बसलो, संध्याकाळी साडेसहा वाजता नाशिकला
पोहोचलो. पुण्याची
गाडी रात्री नऊ वाजता होती. तेव्हा असं
ठरलं की थोडा टाईमपास करावा, वाटल तर जेवण करावं आणि मग पुढच्या
गाडीत बसाव.
मग नोकरीला लागलो
आणि पहिल्याच नोकरीत इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंग करण्यासाठी भारतभर - विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू व गुजरातला जावे लागले. दिवसेंदिवस अनोळखी
ठिकाणी आगगाडीचा - एसटीचा
प्रवास, शिवाय हातात
प्रवासासाठी दिलेला पगाराव्यतिरिक्त असलेला प्रवास भत्ता! मग काय, त्यामुळे भरपूर व मनसोक्त सिगारेटी फुंकणे
हा एकच कलमी कार्यक्रम झाला होता.
पाहता पाहता
मी नोकरीमध्ये स्थिरावलो आणि सिगारेटचे व्यसन सुद्धा. माझ्या आईने आमच्या फॅमिली डॉक्टरला
एकदा सांगून पण बघितले की याचे हे व्यसन सोडवा. फॅमिली डॉक्टर श्रीकांत करंदीकर मोदी
गणपती जवळचा एकदम भारीच, तो म्हणाला
मला जोपर्यंत कुठला त्रास होत नाही तोपर्यंत ओढू दे सिगारेट, तुम्ही काळजी करू नका! डॉक्टर करंदीकर हे सैन्यातून निवृत्त झाले होते; त्यामुळे त्यांना एकदम परफेक्ट अंदाज
होता की कुणाला काय झेपेल आणि काय नाही. असो.
अशा रीतीने २४ वर्ष
कार्पोरेट कंपन्यांमध्ये काढून मी कारकीर्दीचा सांधा बदलला आणि
शैक्षणिक क्षेत्रात आलो. शिक्षक म्हणजे गुणांचा पुतळा! त्यामुळे विद्यार्थ्यांचे समोर तरी
सिगारेट ओढायची नाही असा एक दंडक होता. तरी नशिबाने
मी व्यावसायिक अभ्यासक्रमांचा शिक्षक होतो त्यामुळे त्यातल्या त्यात बरे. मी पत्रकार नगर च्या पुढच्या विखे पाटील
कॉलेजमध्ये असताना सहकाऱ्यांचे बरोबर तिसऱ्या मजल्यावरच्या गच्चीत जायचो आणि तिथे
सिगरेट ओढायचो व तेथल्या विटांच्या ढिगात थोटके
टाकायची. आम्ही गमतीने म्हणायचो कि येथे उत्खनन
झाले काही वर्षांनी तर हा थोटकांचा ढीग बघून काय
निष्कर्ष काढतील काही सांगता येत नाही. शैक्षणिक
क्षेत्रात काही वर्षांनी एका व्यवस्थापन महाविद्यालयाचा संचालक झाल्यावर तर
धुम्रपानाचे फारच वांधे झाले!
अशा रीतीने
पाहता पाहता माझ्या धूम्रपानाला १९७२ नंतर २०२० पर्यंत ४८ वर्षे झाली. तेव्हढ्यात करोनाची साथ आली, लॉकडाऊन झाला व दुकान बंद पडल्यामुळे
सिगारेट मिळण्याची पंचाईत झाली. उरलेली थोटके ओढून ओढून फिल्टरपर्यंत
संपली. माझ्या
शेजार राहणारे गॅरेज-मालक सिगारेट
कुठून कुठून आणायचे आणि मग आम्ही अर्धी-अर्धी ओढायचो.
पण हा करोनाचा
काळ फार अवघड गेला. सिगारेट ओढण्याचे, न ओढण्याचे उपवास फार झाले. त्यातून माझे या विषयातले दोन गुरु
म्हणजे माझा मोठा भाऊ आणि माझ्या मोठ्या बहिणीचे यजमान - मेव्हणे हे दोघेही करोनाने बाधित होऊन
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला बळी पडले. डॉ. पद्माकर पानट सर तर दोन वर्षांपूर्वीच वारले होते. काही महिन्यांपूर्वी डॉ. श्रीकांत करंदीकरही वारले. कदाचित ह्या घटनांचा ही परिणाम माझ्यावर झाला असेल आणि मग
गेल्या दिवाळीपासून ही सिगरेट ओढण्याची सवय आणि तलफ एकदम संपलीच.
या सगळ्या
दिवसांत बायकोची आणि मैत्रिणीची कुरकुर असायची - पण फार नाही. माझा नातू मात्र फारच कडकड करायचा. मी सिगरेट
सोडली यावर त्याचा विश्वासच बसेना. आनंद झाला त्याला. म्हणाला आता हेच तू माझ्या बाबाला सांग - म्हणजे माझ्या मुलाला. अर्थात माझा
मुलगा काही फार सिगारेट ओढत नाही, जेमतेम एक-दोन कांड्या दिवसाला.
पण एकंदरीत माझ्या लक्षात आलंय की
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तुमची जीवनशैली तुम्हाला झेपणारी हवी. त्याप्रमाणे गेल्या दोन वर्षांपासून मी अतिशय जाणीवपूर्वक जीवनशैली मध्ये
बदल करायचा प्रयत्न करीत आहे. याचा अर्थ
प्रत्येकानेच आपले व्यसन सोडले पाहिजे असे नाही. आपल्याला जर आवडत असेल
आणि प्रकृतीला सोसत असेल तर कुठलेही व्यसन किंवा सवय चालू ठेवायला हरकत नाही. तेव्हा मित्रांनो मजा चालू ठेवा, एवढेच मी सांगेन!
१३
ऑक्टोबर २०२१
No comments:
Post a Comment