माझे बडबडगीत
गडक-यांच्या घराजवळ मला एक चेंडू सापडला
फार मोठा नाही, फार लहान नाही, पण म्हणा लहानच.
सूर्यापुढे चंद्र लहानच नाही का?
चेंडू रस्त्यावर पडला होता.
डांबर आणि खडीचा रस्ता खडबडीत.
मी जीवनात आत्तापर्यंत खडी वरूनच चाललो आहे.
टोचत नाही? वा !नाही कशी, टोचते की!
पण आता माझ्या पायाच्या रक्ताचा आणि खडीचा फार
जवळचा संबंध आलाय.
आता तुम्ही सांगा - जवळच्या माणसाला कधी बोलत कुणी?
तर गडक-यांच्या घराजवळ मला एक चेंडू सापडला.
अर्थातच मी तो हातात घेतला
खरं म्हणजे मला चेंडू खेळायला आवडत नाही.
चेंडूचा आणि माझा संबंध फार कमी वेळा आलाय.
मित्र म्हणाला - मला दे.
म्हंटलं - तुझ्यापेक्षा माझ्या हातात बरा दिसेल.
त्याने चेंडू हिसकला - मी त्याला दोघातले राजकीय संबंध
दुरावण्याची धमकी दिली.
तो म्हणाला तुला आता निषेध खलीता पाठवतो.
मला राजकारणात पोरखेळ अजिबात आवडत नाहीत.
मी त्याला म्हटलं आपण ती येईपर्यंत चेंडू खेळू.
तर गडक-यांच्या घराजवळ मला एक चेंडू सापडला.
मी वाट पाहतोय - मी म्हटलं. कुणाची? - तो म्हणाला.
कुणाची म्हणजे चेंडूची - टाक ना चेंडू.
त्याने चेंडू टाकला तो चांदण्यात अडकला.
मग आम्ही खूप खूप ओरडलो - बाल प्लीज बाल प्लीज
कुणी चंद्रीकेने टाकला कुणास ठाऊक.
मी म्हटलं - आला रे आला! मूर्ख!
त्याला वाटले चेंडू आला.
मोगर्याचा सुगंध, चाफ्याचा गंध,
वा-याच्या मंद झुळुकीबरोबर आला.
ती म्हणाली - उशीर झाला म्हंटलं कुणाला?
ती म्हणली मला.
म्हटलं - आम्ही तोपर्यंत चेंडू खेळलो, ती म्हणाली -कुठला?
गडक-यांच्या घराजवळ मला एक चेंडू सापडला.
मला तिच्या नेहमीच्या सबबी पाठ आहेत.
तिच्या सगळ्या लकबी मला ठाऊक आहेत.
फालतू बडबडली आणि जाताना म्हणाली-
अजून थांबू का?
म्हटलं - चंद्रप्रकाशाला पृथ्वीवर यायला
कुणी इन्व्हाईट करत नसतं, त्यांना आपणहून यायचं असतं
आणि थांबायचं असतं. तरीही ती गेली.
मी मित्राला म्हटलं - हा चेंडू चंद्राकडे टाकला तर काय होईल?
तो म्हणाला चेंडू रीबाउंड होईल आणि फार तर
एसपी पाठीमागच्या शेवग्याच्या शेंगा पडतील.
म्हटलं - टाकून तर बघूया.
चेंडू टाकला तो आलाच नाही,
चंद्रावरच अडकून पडला
गडक-यांच्या घराजवळ मला एक चेंडू सापडला.
- ३ मे १९७४
No comments:
Post a Comment