वेब व्हर्जन

मोबाईल व्हर्जन पेक्षा वेब व्हर्जन मध्ये जास्त छान दिसते.

Friday, 30 September 2022

स्वगत



नेहमीप्रमाणे सकाळचे आठ वाजले होते, अगदी काल वाजले तसे किंवा उद्या वाजतील तसे. केकाटणाऱ्या सिलोन वर पद्मिनी  परेराने आपल्या नाजूक आणि आर्जवी आवाजात “Loma time, its 8 a.m.” सांगितलं. साडेआठची २८ गाठायची म्हणजे आता निघायला हवं होतं. कारण साडेआठची  २८  साडेआठला निघाल्याच कुणाला माहित नव्हतं. ती गाडी ८.२० किंवा ८.२५ लाच सुटायची.   हजारो मैल लांब असलेल्या पद्मिनी परेराच्या आवाजाने' सुखावला. आवाजाप्रमाणे पद्मिनी दिसायला पण नाजूक असेल का याचा विचार करत तो मार्गस्थ झाला.


पाहता पाहता लकडी पूल मागे पडला. पुलाच्या कठड्याच्या रूपाने आठवणींचे कठडे त्याच्याभोवती फेर धरून उभे राहिले. त्या भूतकाळातल्या आठवणींना विसरण्यासाठी' झपाझप चालू लागला. समोरच्या जाहिरातीमधीलप्रकाशचे माक्याचे तेललावणारी पोरगी नेहमीप्रमाणेच गोड हसत होती. ही पोरगी' सारखी दिसते असे त्याला नेहमी वाटायचे. त्या पोरी कडे पाहून' ची आठवण झाल्यावर सुद्धा त्याला रोजच्या सारखे उल्हसित वाटले नाही. त्यातून हवा तर साली  अशी भिकार !  हवेचा आणि मानसिक स्थितीचा काही संबंध असतो का? एकदा सायकॉलॉजी डिपार्टमेंटला जाऊन विचारले पाहिजे. विचारांच्या गर्दीतून वाट काढत तो  डेक्कनवर  आला. साडेआठची २८ तयारच  होती. नेहमीचंपब्लिकही  आपापल्या जागा धरून तयार होतं. त्याच्यासाठी जणू एक जागास्त्रियांसाठी राखीव’ (स्त्री उतारू असल्यास)  च्या काचेमागे ठेवली होती. त्याच्या पाठोपाठ कंडक्टरही चढला. ८.२३  झाले होते मगही ८.३० ची बस निघालीच पाहिजे आणि मग'च्या विचारा बरोबर गाडी भरधाव धावू लागली.

 

पाठीमागे बसून तो महापालिकेच्या रस्त्यांचे खड्डेenjoyकरीत होता ड्रायव्हर म्हातारा असूनही dynamic होताsharp turns मारत होता. कुणीतरी म्हटलेल'ला आठवलं-If you want to enjoy the thing, you have to pay for it.हे खड्डेenjoyकरण्यासाठी त्याने ३० पैसे मोजले होते. पण जीवनातले खड्डे? ते कुठल्याही भरावाने भरून येण्यासाठी नव्हते.' पुटपुटला. पण हे खरं नव्हतं. आठवणींच्या बरोबर येणाऱ्या मनस्तापाचा रूपाने तो अजूनहीpayकरत होता, करीत राहणार होता. मनस्तापाचा ट्रकखाली त्याच्या मनाच्या चिंधड्या झाल्या होत्या. ड्रायव्हरने समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकला सफाईने टाळलं होतं. त्याला वाटलं - पुढच्या स्टॉपला उतरावं वाटेतच आणि  जाऊच नये युनिव्हर्सिटीत.

 

ज्या गावाला जायचे नाही त्याची वाट विचारू नये असे म्हणतात. आत्ता पुलावर' दिसली, तेव्हा त्याला याची आठवण झाली. जाता जाता तिने Glad-to-see-you नावाचे एक गोंडस हास्य त्याच्याकडे टाकलं होतं. पण Glad-to-see-you चे  दिवस गेले होते आणि आता शिल्लक राहिला होता फक्त पोकळपणा! असो. वाट विचारली तरी जाऊ नये आणि गेले तर अर्ध्या वाटेतून परत येऊ नये; पण या सगळ्या गोष्टी त्यांने केल्या होत्या.

 

म्हसोबा गेटकंडक्टर ओरडला. एवढ्या वेळात गाडी फक्त एवढीच आली होती. बंद पडण्याबद्दल फेमस असलेली गाडी आजही बंद पडली तर पहिला तास बुडेल या विचाराने तो आनंदला. पण गाडी काही बंद पडली नाही आणि एका खड्ड्यातून मात्र उडाली. त्याच बरोबर आपली  ‘मालमत्ताटाइट बांधून समोर बसलेलीविशालवक्षादाणकन उडाली. सगळ्यांचे डोळे तिकडे वळले. कोणी तिच्याअंतर्यामीचा ठाव घ्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे विशालवक्षेच्या डावीकडे बसलेल्या चवळीच्या शेंगेच्या मनात पेटलेला मत्सराग्नी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. काही वर्षांपूर्वी' असे विचार करायला भीत होता. पण आता तो थोडा मोठा झाला होता. Mature. संजूच एकदा म्हणाली होती - आता आपण मॅच्युअर झालो. यालाच Maturity म्हणतात का?

 

पाहता पाहता चतुश्रुंगी आली आणि धावत्या गाडीबरोबर शिरणारी हवा त्याच्या मनातून आरपार गेली. अर्ध्या वाटेतून उतरण्याचा विचार त्याच्या मनातून साफ गेला होता. After all, what is life? Life is a journey, there is no use of expecting to arrive somewhere. माणूस हा जीवनाचा सर्वात मोठा प्रवासी आहे कोठेही न थांबणारा. भूतकाळाने मला एवढे तरी शिकवले आहे; ‘मनाशीच म्हणाला.

 


गाडी वळून आत शिरली.  मेन बिल्डिंग चा मनोरा दिसायला लागला राजभवन पोलीस चौकीच्या Watch Tower ची चार घड्याळे काळाला चकवण्याच्या  (की  चुकवण्याच्या) उद्देशाने पुढे पळत होती. पण त्यांच्या  त्यांच्यात देखील मेळ नव्हता. शेवटचे ठिकाण आलं तरी त्याचं मन अजून कुठे मागेच रेंगाळत होतं.' ला वाटलं गेली वीस वर्ष आपण हा जीवन प्रवास केला पण आपण आहोत तेथेच आहोत किंवा होतो तेथेच परत आलो आहोत. आणि मधल्या घटना, जीवनात आलेली माणसे उगवत्या काळाबरोबर कुठेतरी अनंतात वाहून गेली आहेत. पण आपला हा प्रवास मात्र असाच चालू राहिला आहे.

 

कुठल्याही गोष्टीला शेवट असा कधी नसतोच. असतो तो प्रारंभ - सुरुवात. घडलेल्या घटनांची - भूतकाळाची भविष्यकाळासाठी वर्तमानकाळाशी केलेली तडजोड, त्यालाच आपण शेवट म्हणतो.

 


शेवटचा स्टॉप आला. लोकांनी उतरण्याची घाई केली. अचानक' ला स्वतःचं प्रतिबिंब समोरच्या काचेत दिसलं. त्याच्याकडे बघून तो हसला. न दाखवता येणार मन म्हणजे जणू ते प्रतिबिंब होत. हे स्वगत माझं आहे, तुझं नाही- प्रतिबिंब म्हणाल. मग त्याचाही नाईलाज झाला. प्रतिबिंब बसमध्ये ठेवून त्याचा पार्थिवदेह रिकामपणाने डिपार्टमेंटकडे चालू लागला. 

  --------------------------------------------------------------------------------

पूर्व प्रसिद्धी: "नचिकेत" - पुणे विद्यापीठ विद्यार्थी वार्षिक १९७५-७६ 

Saturday, 6 November 2021

माझे बडबडगीत

 माझे बडबडगीत


  गडक-यांच्या घराजवळ मला  एक चेंडू सापडला

  फार मोठा नाही, फार लहान नाही, पण म्हणा लहानच.

सूर्यापुढे चंद्र लहानच नाही का?

  चेंडू रस्त्यावर पडला होता.

  डांबर आणि खडीचा  रस्ता खडबडीत.

  मी जीवनात आत्तापर्यंत खडी वरूनच चाललो आहे.

  टोचत नाही?  वा !नाही कशी,   टोचते की!

  पण आता माझ्या पायाच्या रक्ताचा आणि खडीचा फार

  जवळचा संबंध  आलाय.

  आता तुम्ही सांगा - जवळच्या माणसाला कधी बोलत कुणी?

  तर गडक-यांच्या घराजवळ मला एक चेंडू सापडला.


  अर्थातच  मी तो हातात घेतला

  खरं म्हणजे मला चेंडू खेळायला आवडत नाही.

  चेंडूचा आणि माझा संबंध फार कमी वेळा आलाय.

  मित्र म्हणाला - मला दे.

  म्हंटलं -  तुझ्यापेक्षा माझ्या हातात बरा दिसेल.

  त्याने चेंडू  हिसकला -  मी त्याला दोघातले राजकीय संबंध

  दुरावण्याची धमकी दिली.

  तो म्हणाला तुला आता निषेध खलीता पाठवतो.

  मला राजकारणात पोरखेळ अजिबात आवडत नाहीत.

  मी त्याला म्हटलं आपण ती  येईपर्यंत चेंडू खेळू.

  तर गडक-यांच्या घराजवळ मला एक चेंडू सापडला.


  मी वाट पाहतोय - मी म्हटलं. कुणाची? - तो म्हणाला.

  कुणाची म्हणजे चेंडूची - टाक ना चेंडू.

  त्याने चेंडू टाकला तो चांदण्यात  अडकला.

  मग आम्ही खूप  खूप ओरडलो - बाल प्लीज बाल प्लीज

  कुणी चंद्रीकेने  टाकला कुणास ठाऊक.

  मी म्हटलं - आला रे आला! मूर्ख!

  त्याला वाटले चेंडू आला.

  मोगर्‍याचा सुगंध, चाफ्याचा गंध,

  वा-याच्या  मंद झुळुकीबरोबर आला.

  ती म्हणाली - उशीर झाला म्हंटलं कुणाला?

  ती म्हणली मला.

  म्हटलं  - आम्ही तोपर्यंत चेंडू खेळलो,  ती म्हणाली  -कुठला?

  गडक-यांच्या घराजवळ  मला एक चेंडू सापडला.


  मला तिच्या नेहमीच्या सबबी पाठ आहेत.

  तिच्या सगळ्या लकबी मला ठाऊक आहेत. 

फालतू बडबडली  आणि जाताना म्हणाली-

  अजून थांबू का?

  म्हटलं - चंद्रप्रकाशाला पृथ्वीवर यायला

  कुणी इन्व्हाईट करत नसतं, त्यांना आपणहून  यायचं असतं

  आणि थांबायचं असतं. तरीही ती गेली.

  मी मित्राला म्हटलं - हा चेंडू चंद्राकडे टाकला तर काय होईल?

  तो म्हणाला चेंडू रीबाउंड होईल आणि फार तर 

एसपी पाठीमागच्या शेवग्याच्या शेंगा पडतील.

म्हटलं  - टाकून तर बघूया.

चेंडू टाकला तो  आलाच नाही, 

चंद्रावरच अडकून पडला


  गडक-यांच्या घराजवळ मला एक चेंडू सापडला.


- ३ मे १९७४


Thursday, 28 October 2021

दुसरे दशक

 

दुसरे दशक

 

सिंहावलोकन, किती छान शब्द आहे!  आयुष्याच्या सहाव्या दशकात आल्यावर बरेच पाठीमागे गेलेले दुसरे दशक वळून बघायचं म्हणजे एकदम वेगळेच वाटते.  माझा जन्म १९५५  सालामधला. पहिल्या पाच वर्षाच्या आयुष्यात आपण काय होतो ते आठवत नाही.  १९६० साली भावे प्राथमिक शाळेत गेलो तो पहिला माझा सार्वजनिक वावर. त्यानंतर १९६१ ते १९७०१९७१  ते १९८०, १९८१ ते १९९०वगैरे वगैरे, अशी पाहता पाहता  सहा दशके गेली. त्यातलं सर्वात संस्मरणीय दशक म्हणजे १९७१ ते १९८०  म्हणजे वय वर्षे १५ ते वय वर्ष २५!

 

आपण कोण होणार याची शाश्वती नसताना मोठी मोठी स्वप्ने बघण्याचा तो  काळ.  महत्त्वाकांक्षा, संधी आणि कार्यक्षमता यांचा एकमेकांशी काही संबंध असतो याची आपल्याला  कल्पनाच नसते. डोक्यात फक्त असते ती फक्त महत्त्वाकांक्षा. आपल्याला एखादी गोष्ट जमेल की नाही त्याचा हिशोबच  नसतो. माझं पण असंच झालं. शाळेतल्या हवाईदलाच्या एनसीसीत असल्यापासून हवाईदलामध्ये जायचं हे मी मनोमन नक्की केलं होतं; पण त्यासाठी काय करावं लागतं. काय नाही काही माहिती नव्हतं. घरामध्ये आईला असं वाटत होतं   की सैन्यात जायचं  म्हणजे  फक्त मरायला! वडील डिफेन्स अकाउंटस मध्ये होते तरी त्यांचे असे  काहीच मत नव्हतं; मोठ्या भावाला वाटायचं मी त्याच्यासारखं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर व्हाव आणि त्याच्यासारखंच भाभा अणुशक्ती केंद्रात किंवा तत्सम सरकारी  प्रयोगशाळेत चिकटून जाव. एकंदरीत काय मी सैन्यात जाण्यासाठी घरून काहीच प्रेरणा नव्हती. त्यामुळे काय झालं की आपला देश एका भविष्यकालीन एअर चीफ मार्शलला मुकला! 

 

अर्थात त्याचे इतरही परिणाम झाले मुख्य म्हणजे इंटरला अपेक्षित मार्क मिळाले नाहीत त्यामुळे पुण्याच्या ऐवजी गोव्यातील फार्मागुडी  येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळत होता; पण वडीलांची निवृत्ती पुढच्याच वर्षी होती.  त्यामुळे ते म्हणाले की जे काय दिवे


लावायचे ते पुण्यातच लावा.  मग शांतपणे गरवारे महाविद्यालयात द्वितीय वर्ष शास्त्र शाखेला प्रवेश घेतला आणि भौतिकी विज्ञान, रसायन शास्त्र आणि गणित असे तीन विषय घेतले. पुढच्या वर्षी म्हणजे शेवटच्या वर्षी गणित नको वाटल, रसायनशास्त्राची घाण वाटायची म्हणून  भौतिकी विज्ञान घेतले आणि त्यात पहिल्याच प्रयत्नात पदवीधर झालो. पण डोक्यातले हवाईदलाचे खूळ गेले नव्हते. त्यामुळे डायरेक्ट एन्ट्री ह्या हवाईदलाच्या योजनेनुसार वाराणशीला जाऊन एकदा जनरल ड्युटी पदासाठी तर  एकदा वैमानिकासाठी परीक्षा दिली. घरच्या अप्रेरणादायी वातावरणामुळे जे व्हायचे तेच झाले. तिसऱ्यांदा म्हैसूरला वायुदलात हवामान शास्त्रज्ञ म्हणून मुलाखतीसाठी बोलावले होते; पण पुण्यातील हवाईदल निवृत्त विंग कमांडर देशपांडे यांनी जाऊ नको असा सल्ला दिला म्हणून मुलाखतीला सुद्धा गेलो नाही.

 


आता एकच मार्ग राहिला म्हणजे भौतिकी विज्ञानात पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदवी म्हणजे एमएससी करणे. त्याप्रमाणे दोन वर्षात भौतिकीविज्ञनात आणि त्यात इलेक्ट्रॉनिक्स हा विशेष विषय घेऊन एमएससी झालो. सरकारी नोकरीचे खूप प्रयत्न केले, पण नशीबात नव्हते. शेवटी भावाच्या ओळखीने पुण्यात  चित्रशाळेपाशी असलेल्या एका लघु इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात  अडीच वर्षे पाट्या टाकल्या; खूप अनुभव मिळाला. अगदी सर्किट डिझाईन पासून ते मेंटेनन्स पर्यंत. साखर उद्योगाला लागणारे इलेक्ट्रॉनिक मशीन हा माणूस बनवत असे. त्यामुळे त्याने मला गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू,   कर्नाटक अशा सगळ्या राज्यांत - जेथे जेथे साखर कारखाना असेल  तेथे तेथे - अशा सुमारे २५० साखर कारखान्यात फिरवले. त्यावेळी रेल्वेत आरक्षणाची पद्धत फारशी नव्हती; शिवाय सर्व साखर कारखाने आत कुठेतरी खेडेगावात, रस्ते जवळजवळ नसल्यासारखेच, एसटी चा भीषण प्रवास, त्यामुळे त्या अडीच वर्षात मी अगदी थकून गेलो.

 


तोपर्यंत १९७९ साल आले होते.आणि मग नशीब पालटायला सुरुवात झाली मुंबईच्या प्रख्यात जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रथमच इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर भरती करायचा ठरवला आणि मी त्याला पात्र ठरलो. मी त्यांच्याकडून कबूल करून घेतलं होतं की एक वर्षाच्या प्रोबेशन नंतर ते मला दिल्लीच्या आय आय टी मध्ये बायोमेडिकल इंजीनियरिंग एमटेक कोर्सला त्यांच्या खर्चाने पाठवतील. त्याबदल्यात मी एमटेक झाल्यावर जसलोकमध्ये पाच वर्ष नोकरी करायची. पण आपण ठरवतो एक आणि होतं एक. दहा महिने झाल्यावर अचानक मुंबईचाकामगारनेता" डॉ दत्ता सामंत याच्या नेतृत्वांने जसलोक हॉस्पिटलमध्ये साडेतीन महिन्याचा संप झाला. मेडिकल, पॅरामेडिकल आणि टेक्निकल म्हणजे मी असं स्टाफ संपामध्ये सहभागी नव्हते. मुख्यतः क्लास तीन आणि चार हे सहभागी होते. पण त्यांनी आम्हाला सर्वांना धमकी दिली की, तुम्ही आत जाऊनच बघा की तुमचं  तंगड तोडतो.  आणि आमच्या एका पॅथॉलॉजी आणि एक्स-रे ऑफिसरच्या बद्दल त्याने ते करून दाखवल. आमची पॅथॉलॉजी ऑफिसर पद्मा अय्यर ही नंतर १९८४ पर्यंत कोमातच होती असं मी ऐकलं, पुढं काय झालं मला माहिती नाही.

 

याचा परिणाम असा झाला  की जसलोकची छान नोकरी  आणि दिल्ली आयआयटीमध्ये एमटेक करायचं स्वप्न हे दोन्ही बोम्बलल.  हातात पैसे नाहीत त्यामुळे मुंबईत राहणार कसं? पुण्याला परतलो.   तो काळ असा होता की भारतामध्ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स विषयाची सुरुवात होती. काही ठराविकच मोठे उद्योग धंदे होते की ज्याच्या मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर भरती व्हायचे. अर्थात महाराष्ट्रातल्या पाच इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि पाच विद्यापीठे यातून फक्त दोनशे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर बाहेर पडायचे पण त्यांनाही नोकरी मिळायची नाही.  माझं सुदैव एवढं की १९७९ च्या  डिसेंबरमध्ये ओळखीने मला मुंबईच्या  एका डेन्मार्क स्थित (डॅनिश) कंपनीत नोकरी लागली आणि माझी गाडी परत रुळावर आली. नंतर कदाचित माझ्या कामामुळे असेल पण त्यांनी पुण्याला एक शाखा काढायची ठरवली आणि मी मुंबईच्या पगारावरच परत पुण्यात आलो. इलेक्ट्रॉनिक्स  मधील तांत्रिक भाग म्हणजे डिझाईन, प्रोडक्शन, इंस्टॉलेशन व  कमिशनिंग कधीच मागे पडले होते  आणि आता मी डॅनिश कंपनीसाठी पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्स प्री सेल्स, मार्केटिंग, प्रमोशन, वगैरे वगैरे यामध्ये कारकीर्द करायची ठरवली.

 

लवकरच माझ्या लक्षात आलं मी जरी इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या विक्री व्यवसायात  असलो  तरी मार्केटिंग मॅनेजमेंटची कुठलीही डिग्री किंवा शिक्षण माझ्याकडे नाही. म्हणून मी पुणे विद्यापीठाचे संध्याकाळचे डीबीएम-एम एम एस मध्ये प्रवेश घेतला; अर्थात तोपर्यंत पुढचे दशक उगवले होते

 

 १९७१ ते १९८०  हा प्रवास अतिशय थरारक असा झाला. आपण योजायचे एक आणि व्हायचे भलतेच! या काळामध्ये झालेल्या अजून एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करायला हवा. १९६० पासून ते १९७१ पर्यंत आम्ही केवळ मुलांच्या शाळेत होतो. मुलींचा जवळ-जवळ संपर्कच नाही. माझी मोठी बहीण माझ्यापेक्षा जवळ जवळ एक तपाने  मोठी असल्यामुळे तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्याताई”  होत्या! या पार्श्वभूमीवर गरवारे महाविद्यालयात भेटलेल्या राजू, सुनितासारख्या सुंदर मैत्रिणींनी ते दिवस अतिशय सुंदर केले. नंतर पुणे विद्यापीठात तर सहशिक्षण होते पण तिथे चांगल्या अशा मैत्रिणी झाल्या नाहीत. कंपनीमध्ये मात्र खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. जसलोक मध्ये मंगल मुळे, सिस्टर आयरिन डिसिल्व्हाडॅनिश कंपनीत  विशेषतः टीना मोतीवालाबेलींडा मेंझिस, फातिमा फर्नांडिसपुष्पा सलढाणाया मुलींनी माझ्यात पूर्वी कधीही नव्हता एव्हढा आत्मविश्वास निर्माण केला. सेल्स आणि मार्केटिंग मॅनेजमेंटला लागणारा सभाधीटपणा, पब्लिक स्पिकिंग आणि भिन्नलिंगी व भिन्न संस्कृती मधल्या सहकाऱ्यांशी कसं बोलावं व वागाव याचं शिक्षण त्यांनी मला दिलं आणि त्यामुळेच पुढच्या काही दशकात मी माझ्या कार्यक्षमतेत वाढ करू शकलो आणि विभिन्न संस्कृतीच्या सहका-यांचे नेतृत्व करून  यशस्वी होऊ शकलो.

 

या दशकात माझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल होतील अशा अजून तीन घटना घडल्या - एक म्हणजे मी गरवारे महाविद्यालयात सायन्स असोसिएशन आणि फिजिक्स असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी झालो. तसेच महाविद्यालयाच्या शेवटच्या दोन वर्षात गरवारे कॉलेजच्या तालमीत (त्यावेळी तालमीला जिम म्हणत नसत) आणि टिळक टँक वर सकाळ संध्याकाळ पडिक असे. त्यामुळे तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाली आणि त्यावेळी मिळालेली शक्ती अजूनही पुरते आहे.  अजून एक गोष्ट अशी की कदाचित आपले मराठीचे मास्तर तीर्थरूप श्री वा कुलकर्णी यांचा प्रभाव म्हणा, मी गोष्टी आणि कविता लिहायला लागलो. प्रत्येक वर्षाच्या वार्षिक अंकात माझी काहीतरी कथा किंवा कविता असायचीच. गरवारे महाविद्यालयात असताना कला शाखेच्या तीन विद्यार्थांच्या बरोबर मिळून मीदूतनावाचे त्रैमासिक आणिपिपाणीनावाचे भिंतीवरचे हस्तलिखित-अनियतकालिक संपादन करून प्रकाशित करत असे. (पिपाणी च्या संपादकाला "पिम्पाद्क" म्हणत!) पण महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील ते फुलपंखी दिवस संपले आणि  कलालेखन सुद्धा.  

 

तर असं हे दशक माझ्या व्यक्तिमत्त्वावर सर्वांगाने परिणाम करणारे! १९७१ ला शाळेतून पांढरा हाफ शर्ट खाकी हाफ चड्डीवर बाहेर पडलेला मी आणि १९८० ला डॅनिश कंपनीत सुटाबुट-टायमध्ये असलेला मी हे दोन्ही वेगळे होतो!

 


Tuesday, 26 October 2021

माझी शाळा - पेरूगेट मुलांचे भावे हायस्कूल, (अर्थातच) पुणे ३०.


माझी शाळा - पेरूगेट मुलांचे भावे हायस्कूल, (अर्थातच) पुणे ३०
.
भवताला बरोबर तुमच्यावर लहान वयात परिणाम करणारी दुसरी गोष्ट म्हणजे तुमची शाळा. ती गोष्ट नव्हेच, एक व्यक्तीच असते. दुस-या-तिस-या वर्षी कळायला लागल तेव्हापासून मनावर ठसली ती माझी शाळा - पेरूगेट मुलांचे भावे हायस्कूल, (अर्थातच) पुणे ३०. आम्ही शाळेच्या पश्चिम भिंतीच्या कडील बोळात राहायचो. बरोब्बर बोळाच्या मध्यावर. त्यावेळी त्या बोळाला टिळकवाडी म्हणायचे - बाजूच्या टिळकरस्त्याची एक गल्ली म्हणून.

शाळा दोन सत्रात भरायची - सकाळ व दुपार. सकळी सव्वासात ते साडे अकरा आणि दुपारी बारा ते साडेपाच. दोन्ही सत्रात दोन मधल्या सुट्ट्या, एक छोटी १० मिनिटांची व एक मोठी २० मिनिटांची. ४५ मिनिटांचा एक तास. हे सगळ इतक्या तपशिलात सांगायचे कारण की शाळेची घंटा सुरुवातीला, तास संपताना, सुट्टी होताना, संपताना व्हायची. म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत घंटा वाजत रहायची आणि त्यानुसार आमची दिनचर्या पण.


८ मार्च २०२१ ला शाळेतून ११ वी एस.एस.सी. करून बाहेर पडल्याला बरोबर ५० वर्षे झाली! परीक्षा संपल्याचा तो दिवस अजून आठवतोय. नुकतीच सगळ्यांना मिसरूड फुटलेली, आणि शिंग ही! आता कोण कुठे जाणार आयुष्यामध्ये कुणास ठाऊक! अर्थात काही हुशार निर्धारी विद्यार्थी होतेच की ज्यांनी त्यांनी ठरवल तेच मिळवलं.

आज ५० वर्षांनी मागे वळून पाहताना किती लांब आलो ते बघून छाती दडपून जाते. पण शाळेची ओढ अजून तशीच आहे. कधीही शाळेचे छायाचित्र दिसले की भारावून जायला होत. ५ वी ते ११ वी - आयुष्यातील मोलाची, नकळत झालेल्या जडणघडणीच्या वर्षाचं गारुड मनात घोंघावत, पापण्या जड होतात, डोळे पाणावतात.

आपला गाजलेला खोखो पटू मित्र हेमंत उर्फ बंडू जोगदेव मात्र आपल्या मुलामुलींच्या शाळेशी खोखो प्रशिक्षक म्हणून अजूनही संबंध ठेऊन आहे. बंडू परवा नेमका ८ मार्चच्या सुमारासच शाळेत गेला होता व त्याने खाली दिलेले ३ व्हिडीओ शूट केले आहेत. तुम्ही बघा, जुन्या आठवणी पण ताज्या होतील. धन्यवाद बंडू.




 


Monday, 25 October 2021

राजूची कविता

 राजूची कविता



गरवारे कॉलेजमध्ये कॉलेजच्या पहिल्या दोन वर्षात आम्ही झालेले ५ मित्र-मैत्रिणी - दोन मुली आणि तीन मुलं. आमच्यापैकी नंतर दोन इंजिनियरिंगला, दोन मेडिकलला आणि मी सायन्सला गेलो. वाटा वेगळ्या झाल्या पण खूप वर्ष एकमेकांच्या संपर्कात होतो. त्यातला मी सर्वांच्या जास्त संपर्कात होतो.  राजू आमची एक सुंदर मैत्रीण, एका संपन्न घरातील. तिचे कागदोपत्री नाव शुभदा होते, पण तिच्या आईवडिलांनी सुद्धा तिला कधी शुभदा हाक मारल्याचे मी ऐकले नाही राजू. फक्त माझी मैत्रीण नव्हती तर ती माझ्या आई-वडीलांची पण मैत्रीण होती आणि पुढे माझं लग्न झाल्यावर ती माझ्या बायकोची पण मैत्रीण झाली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर सगळेजण आपापल्या मार्गांनी गेले.  शौनक अमेरिकेला, सुनिता लग्न होऊन दुसऱ्या गावी गायनॅकची प्रॅक्टिस करायला, संजय मुंबईला. मी आणि राजू मात्र पुण्यात होतो, त्यामुळे त्यातल्या त्यात आमच्या भेटी गाठी जास्त शिवाय, माझ्या घरासमोर तिचा मामा  पण राहायचा. बरेच वेळा तर ती आमच्याकडे येऊन जायची, जेवायची पण आणि मला पत्ताच  नसायचा कधीतरी दोन-तीन दिवसांनी अप्पा म्हणजे माझे वडील राजू येऊन गेल्याचे  ओघाओघात सांगायचे.


अशी ही राजू आणि तिच्याच हस्ताक्षरातील तिची ही कविता (साधारण १९७७-७८ मध्ये लिहिलेली)


 रंगून भंगलेल्या स्वप्नात आज दंग

 जळण्यात जागलेल्या  श्वासात हाच छंद

 राखेतली स्मृती ही अजुनी प्रसन्न आहे

 घायाळ प्रीत माझी अजूनही जिवंत आहे


 रंगुनिया वसंती शरदात नाहलेली

 गीतात  माळली मी कुसुमे तुझ्याचसाठी

 त्या वाळल्या फुलांना अजुनी सुगंध आहे

 घायाळ प्रीत माझी अजूनी जिवंत आहे



मला आजही तिच्या ह्या कवितेबद्दल काही म्हणजे काही आठवत नाही. तिने ही कुठल्या मनस्थितीत लिहिली, केव्हा लिहिली वगैरे. जरी आम्हा सर्वांना एकमेकांची गुपिते ब-यापैकी माहित असली तरी ही कविता कुणाला उद्देशून लिहिली हे मात्र गुलदस्त्यातच राहिले.

राजू एक चांगली डॉक्टर तर होतीच पण उत्तम कवयित्री / लेखिका  आणि चित्रकार पण  होती. तिने शौनकला अमेरिकेला जाताना एक ऑईल कलरचे पेंटिंग पण भेट दिले होते.


राजू आता नाही, गेली ती खूप वर्षांपूर्वी एका असाध्य रोगाने. पण ही कविता माझ्याकडे तिची कायमची आठवण राहील.





Thursday, 21 October 2021

दिवसेंदिवस

महाविद्यालयात असताना आणि नंतरही काही दिवस मी कविता करत असे.  कवितांची ही डायरी मला जवळजवळ चाळीस वर्षांनी  अचानकच सापडली.  त्यातली ही एक शेवटची कविता. १९७९ साली लिहलेली. ह्या कवितेची पार्श्वभूमी अशी की मी मुंबईला नोकरीला लागलो होतो. भावाकडं डोंबिवलीला राहात असे. सकाळी सात वाजता निघालं घरून की संध्याकाळी घरी यायला  साडेसात वाजत.  निघताना पण  मी पेंगुळलेला असे आणि येताना पण. मला आश्चर्य वाटायचं ही मुंबईची माणसं कशी काय जगतात,  एवढ्या अवघड परिस्थितीत?  एक प्रकारचं नैराश्य कायम भोवताली असायचं; त्यातूनच ही कविता  स्फूरली असावी::

दिवसेंदिवस




 उगवतीचा आणि मावळतीचा सुद्धा,

 सूर्य मी कधीच बघत नाही.

 माझ्या सोबतीला असतो तो भर

 माध्यान्हीचा सूर्य. स्वतःच्या अस्तित्वाची

 प्रकर्षाने जाणीव करून देणारा.


 झोपलेल्या सूर्याच्या अगोदर मी

 चालू लागतो,  पेंगुळलेली पहाटेची

 स्वप्न दाराआड ठेवून थेट.

 इकडं तिकडं न बघता.


 आणि संध्याकाळच्या रंगांची धमाल

 संपल्यावर मी येतो.

 खाडीवरच्या  मासेमारी   होडयांचे

 दिसेनासे होणारे दिवे  पहात  व

 धुंद(?)  खारा वारा अंगावर  घेत..

 घरी ठेवलेली ती पहाटेची स्वप्ने

 येऊ पाहतात डोळ्यांवर.


 तुझीही आठवण  होते.

 गालांवरचा  तांबडा जल्लोष  आणि

 मग अनुक्रमे येणाऱ्या आठवणी

 मांडणीवरच्या जुन्या भांड्यांवरील

 नावाप्रमाणे दिवसागणिक  अंधुक होत जातात.

 निदान तस वाटत तरी.

 पण ती चकचकणारी भांडी मनात

 शाबूत असतात. अगदी काळ निरपेक्ष.


 मी निघतो. पुन्हा एकदा ती  पहाटेची

 भन्नाट स्वप्न दाराआड करुन.

 फक्त माध्यान्हीचा सूर्य बघण्यासाठी.


  • जयंत पानसे 

    • १ मे १९७९ 

स्वगत

नेहमीप्रमाणे सकाळचे आठ वाजले होते , अगदी काल वाजले तसे किंवा उद्या वाजतील तसे. केकाटणाऱ्या सिलोन वर पद्मिनी   परेराने आपल्या नाजूक आणि आर्...