वेब व्हर्जन

मोबाईल व्हर्जन पेक्षा वेब व्हर्जन मध्ये जास्त छान दिसते.

Thursday, 14 October 2021

माझा सिगारेट प्रवास

 

माझा  सिगारेट प्रवास


माध्यमिक शाळेतून बाहेर पडलं की खूप क्षितिजे खुणावत असतात. पंधरा सोळा वर्षांच वय आणि त्यातून तुम्ही जर फक्त मुलांच्या शाळेत असाल तर मग मुलींच्या बरोबरच्या  सहशिक्षणाची गंमत वेगळीच.  आमच असंच  झालं.  पुरुषार्थ दाखवण्याच्या विविध हिकमती त्यावेळेला  सर्वच मित्र दाखवायचे, त्यातले एक  म्हणजे दाढी मिशी.  माझ्या आठवणी प्रमाणे शाळेमध्ये फक्त मी आणि श्रीनिवास पुंडले अशा दोघांनाच शाळा सोडायच्या आधी भरपूर दाढी आणि मिशी आली होती. मला तर मित्र अस्वल्या म्हणायचे. त्यामुळे मी जरा वयाच्या मानाने थोराड दिसायचो. त्यातून तेव्हा सैन्यात जायचे वेड  लागले होते त्यामुळे तालमीत जाणे वगैरे उद्योगही करत असे.  -याच नातेवाईकांना असे वाटे की मी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात नसून दुसऱ्या-तिसऱ्या वर्षात असेन.

 

२२ जानेवारी १९७२  रोजी माझ्या भावाचं लग्न झालं. आमच्या वहिनी इंदूरच्या. त्यावेळी पुणे-इंदूर अशी कुठलीच आगगाडी नव्हती आणि बस पण नव्हती. जाताना आम्ही खांडव्यापर्यंत आगगाडीने गेलो आणि तिथून मग बसने. येताना मात्र इंदूर-नाशिक या एसटीने आलो. पुण्यापर्यंत थेट एसटी नव्हती. सकाळी इंदूरला बसलो, संध्याकाळी साडेसहा वाजता नाशिकला पोहोचलो. पुण्याची गाडी रात्री नऊ वाजता होती. तेव्हा असं ठरलं की  थोडा टाईमपास करावा, वाटल तर जेवण करावं आणि मग पुढच्या गाडीत बसाव. 

 



लग्नाचे परतीचे  -हाड,  त्यामुळे सामान भरपूर. त्यावेळच्या नाशिकच्या बस स्टँड वर अगदी किरकोळ दिवे होते. मग ठरलं की आळीपाळीने जेवून यायचं;  म्हणजे काहीजणांनी सामानाबरोबर थांबायचं. बायका-मुलांचे जेवण झालं की मग पुरुषांनी जेवायला जायचं. त्याप्रमाणे आम्ही जेवून घेतलं. जेवण झाल्यावर भावाचा मित्र बब्बड खिरे म्हणाला चल जरा बाहेर जाऊ. त्यांच्याबरोबर त्याचा मोठा भाऊ  नंदू  आणि भावाचा दुसरा मित्र कुलकर्णी असे होते.  सदाशिव पेठेच्या हौदाशेजारील आपल्या अतुल कारखानीसच्या वाड्यात शेजारी राहायचा बब्बड. मला वाटतं बंडू निघोजकर पण त्याच वाडयतला.  मला कळेना की बाहेर  कशाला जायचं  मग नंतर कळलं की सिगरेट फुंकण्याचा कार्यक्रम होता. त्यांच्याकडं मेन्थाॅलची नॉर्थ पोल नावाची एक सिगारेट होती. त्याने मस्त सिगारेट पेटवली, शिलगावली आणि मलापण देऊ केली. मी ओशाळत नाही म्हणालो. तो म्हणाला, हे काय कॉलेजच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षात आहेस आणि अजून शिकलाच नाहीस सिगारेट ओढायला? थापा मारतोयस! आणि तू घेच. मी  हे दिन्याला सांगणार नाही. दिनेश म्हणजे माझा मोठा भाऊ. तो ओढायचा सिगारेट, पण मला त्यांने कधी दिली नव्हती.  शेवटी हो ना करता करता मी सिगारेट घेतली! तर अशी ती माझी पहिली सिगारेट कॉलेजच्या पहिल्या वर्षात ओढलेली.

 

त्यानंतर जवळ जवळ पुढची पाच सहा वर्ष मी सिगारेट फारशी ओढत नसे. माझा भाऊ आणि मेव्हणे हे एकच ब्रँड ओढायचे - ब्रिस्टॉल आणि ते आले घरी हळूच मला म्हणायचे की कोपऱ्यावर जाऊन येऊ आणि मग तिथे जाऊन  सिगारेट ओढायची; त्यावर एक मसाला पान खायचं आणि मग घरी यायचं. अशा रीतीने एम. एस्सी. होईपर्यंत रुटीन चालू होत. विद्यापीठात भौतिक शास्त्र विभागात एम. एस्सीला शिकवायला डॉ. पद्माकर पानट सर होते, त्यांचा ब्रँडही  ब्रिस्टॉलच! कधी कधी सर मूड मध्ये असतील तर मिळायची एखादी सिगारेट. तोपर्यंत असे काही समव्यसनी मित्र पण लाभले. पण पैसे कुणाकडेच नसायचे, असेच कुठेतरी मिळालेले पाच पैसे - दहा पैसे जमा करून एक ब्रिस्टॉल पाच पैशाला आणि एक चहा दहा पैशाला असा आठवड्यातून एकदा काहीतरी सामुदायिक कार्यक्रम चालायचा.  फारच  तलफ आली तर पाच  पैशाला  तीन  विडया घ्यायच्या;  मग  रात्री अभ्यासाच्या नावाखाली गरवारे महाविद्यालयात उशीरापर्यंत बसून  मुतारीच्या आडोशाला त्या विड्या ओढायच्या.  गरवारे महाविद्यालयात मुतारीला पार्लमेंट म्हणायचे  कारण ते गोल होते.

 

मग नोकरीला लागलो आणि पहिल्याच नोकरीत इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंग करण्यासाठी भारतभर - विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू  व गुजरातला जावे लागले.  दिवसेंदिवस  अनोळखी ठिकाणी आगगाडीचा - एसटीचा प्रवास, शिवाय हातात प्रवासासाठी दिलेला पगाराव्यतिरिक्त असलेला प्रवास भत्ता! मग काय, त्यामुळे भरपूर व मनसोक्त सिगारेटी फुंकणे हा एकच कलमी कार्यक्रम झाला होता.

 

पाहता पाहता मी नोकरीमध्ये स्थिरावलो आणि सिगारेटचे व्यसन सुद्धा. माझ्या आईने आमच्या फॅमिली डॉक्टरला एकदा सांगून पण बघितले की याचे हे व्यसन सोडवा. फॅमिली डॉक्टर श्रीकांत करंदीकर मोदी गणपती जवळचा एकदम भारीच, तो म्हणाला मला जोपर्यंत  कुठला त्रास होत नाही  तोपर्यंत ओढू दे  सिगारेट, तुम्ही काळजी करू नका! डॉक्टर करंदीकर हे  सैन्यातून निवृत्त झाले होते; त्यामुळे त्यांना एकदम परफेक्ट अंदाज होता की कुणाला काय झेपेल आणि काय नाही.  असो.

 

 अशा रीतीने २४ वर्ष कार्पोरेट कंपन्यांमध्ये काढून  मी कारकीर्दीचा  सांधा बदलला  आणि शैक्षणिक क्षेत्रात आलो.  शिक्षक म्हणजे गुणांचा पुतळा! त्यामुळे विद्यार्थ्यांचे समोर तरी सिगारेट ओढायची नाही असा एक दंडक होता. तरी नशिबाने मी व्यावसायिक अभ्यासक्रमांचा शिक्षक होतो त्यामुळे त्यातल्या त्यात बरे. मी पत्रकार नगर च्या पुढच्या विखे पाटील कॉलेजमध्ये असताना सहकाऱ्यांचे बरोबर तिसऱ्या मजल्यावरच्या गच्चीत जायचो आणि तिथे सिगरेट ओढायचो व तेथल्या विटांच्या ढिगात थोटके टाकायची.  आम्ही गमतीने म्हणायचो कि येथे उत्खनन झाले काही वर्षांनी तर हा थोटकांचा ढीग बघून काय निष्कर्ष काढतील काही सांगता येत नाही. शैक्षणिक क्षेत्रात काही वर्षांनी एका व्यवस्थापन महाविद्यालयाचा संचालक झाल्यावर तर धुम्रपानाचे फारच वांधे झाले!

 

अशा रीतीने पाहता पाहता माझ्या धूम्रपानाला १९७२ नंतर २०२० पर्यंत ४८ वर्षे झाली. तेव्हढ्यात करोनाची साथ आली, लॉकडाऊन झाला व दुकान बंद पडल्यामुळे सिगारेट मिळण्याची पंचाईत  झाली. उरलेली थोटके  ओढून ओढून  फिल्टरपर्यंत संपली. माझ्या शेजार राहणारे गॅरेज-मालक सिगारेट कुठून कुठून आणायचे आणि मग आम्ही अर्धी-अर्धी ओढायचो. 

 

पण हा करोनाचा काळ फार अवघड गेला. सिगारेट ओढण्याचे,  न ओढण्याचे  उपवास  फार झाले. त्यातून माझे या विषयातले दोन गुरु म्हणजे माझा मोठा भाऊ आणि माझ्या मोठ्या बहिणीचे  यजमान - मेव्हणे हे दोघेही करोनाने बाधित होऊन पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला बळी पडले. डॉ. पद्माकर पानट सर तर दोन वर्षांपूर्वीच वारले होते. काही महिन्यांपूर्वी डॉ. श्रीकांत करंदीकरही वारले. कदाचित ह्या घटनांचा ही परिणाम माझ्यावर झाला असेल आणि मग गेल्या दिवाळीपासून ही सिगरेट ओढण्याची सवय आणि तलफ एकदम संपलीच.

 

या सगळ्या दिवसांत बायकोची आणि मैत्रिणीची कुरकुर असायची - पण फार  नाही. माझा नातू मात्र  फारच कडकड  करायचा.  मी सिगरेट सोडली यावर त्याचा विश्वासच बसेना. आनंद झाला त्याला. म्हणाला आता हेच तू माझ्या बाबाला सांग - म्हणजे माझ्या मुलाला.  अर्थात माझा मुलगा काही फार सिगारेट ओढत नाही, जेमतेम एक-दोन कांड्या दिवसाला.

 

पण एकंदरीत माझ्या लक्षात आलंय की वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तुमची जीवनशैली तुम्हाला झेपणारी हवी. त्याप्रमाणे गेल्या दोन वर्षांपासून  मी  अतिशय  जाणीवपूर्वक  जीवनशैली मध्ये बदल करायचा प्रयत्न करीत आहे. याचा अर्थ प्रत्येकानेच आपले व्यसन सोडले पाहिजे असे नाही. आपल्याला जर  आवडत असेल आणि प्रकृतीला सोसत असेल तर कुठलेही व्यसन किंवा सवय चालू ठेवायला हरकत नाही. तेव्हा मित्रांनो मजा चालू ठेवा, एवढेच मी सांगेन!

 १३ ऑक्टोबर २०२१

Friday, 12 February 2021

पेठ सदाशिव

  

सदाशिव पेठेतील माझी  पहिली आठवण  म्हणजे मी आमच्या वाड्याच्या दरवाज्यात  उभे राहून इकडे तिकडे बघतोय. साधारण पाच वर्षांचे वय उंची जेमतेम अडीच फूट असावी, त्यामुळे आसपासची माणसं काय, जनावर काय, वस्तू काय, सगळेच माझ्यापेक्षा टोलेजंग. मी राहायचो  त्या गल्लीला अनेक नावे होती. टिळक रोडची   गल्ली म्हणून तिला टिळकवाडी  म्हणायचे. टिळक रोड क्रॉस केला की समोर येणाऱ्या भागास चिमणबाग म्हणायचे. खरं म्हणजे चिमणबाग  ही अजूनही एक मोठी चाळ आहे  आणि मग बाकीचे बंगले, वाडे तेथे आहेत पण त्या भागाला सगळे मिळून  चिमणबागच म्हणतात. उजव्या हाताला रावबहाद्दूर गडकरी यांचा टुमदार बंगला होता रावबहाद्दूर यांच्या इतिहासाबद्दल मला काही माहीत नाही, पण ते उग्र  दिसणारे पण तसे प्रेमळ असं व्यक्तिमत्त्व होतं.  त्यांच्या घरावरून जाणारा हा चिमणबागेचा रस्ता  टिळक रोड क्रॉस करून आमच्या गल्लीत यायचा अगदी डॉक्टर गो.रा. परांजपे यांच्या घरापर्यंत. राव बहाद्दूर गेल्यानंतर त्याला  महानगरपालिकेने रावबहाद्दूर गडकरी पथ असं नाव  दिल. आता त्याला काय म्हणतात माहिती नाही. 


आमच्या वाड्याच्या पूर्वेला म्हणजे समोरच पेरूगेट  मुलांची भावे स्कूलचे  मोठेच  मोठे ग्राउंड,  त्याला तारेचे कंपाउंड. अर्थात याला काही अर्थच नव्हता. आमच्या इथे सगळेच विद्यार्थी  तारेच्या कुंपणाच्या भोकातून जायचे शाळेत. खर   म्हणजे मुख्य दार दुसरी  कडेच होते  टिळकवाडी च्या दोन टोकांना दोन विजेचे खांब  आणि एक  मध्ये, म्हणजे आमच्या वाड्यापाशी, त्यावर चाळीस   वॅटचे  मीणमिणते दिवे.  संध्याकाळी ते दिवे पेटत पण फारसा उजेड पडत नसे, त्याची गरज ही नसायची  कारण संध्याकाळी साडेसहा नंतर  सगळीच रहदारी  हळूहळू मंद व्हायची


पुण्याची सदाशिव पेठ म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या चर्चेचा विषय! कधी कुतूहल कधी हेटाळणी कधी हेवा,  अशा अनेक भावना लोकांच्या मनात आहेत कारण काय ते कळत नाही. आहे मात्र  खरं. मग तुमच्या मनातल्या भावना कशा आहेत, त्यावर तुम्ही सदाशिव पेठवर असे विनोद करणार आणि स्वतःच पोट धरून हसणार. सदाशिव पेठेत राहिलेल्या किंवा राहणाऱ्या कुणालाही तुमच्या विनोदांचा काहीही फरक पडत नाही कारण त्यांना माहिती आहे सदाशिव पेठी असणं म्हणजे काय!


आता तुम्हाला माहिती असेलच की पेशव्यांनी  जेव्हा  ही पेठ वसवली तेव्हा आपल्या ज्येष्ठ काकांचे नाव - सदाशिवराव भाऊंचे नाव या पेठेला दिले. इतिहासात डोकावले तर सदाशिवराव भाऊ म्हणजे बुद्धिमान, उत्तम तारतम्य बाळगणारे, सम्यक  वृत्तीचे  आणि आपण बरे आणि आपले काम बरे अशा स्वभावाचे गृहस्थ होते. आता आपण सदाशिव पेठेत राहणाऱ्या लोकांचे  स्वभाव बघितले तर  सदाशिवराव भाऊंच्या स्वभावाची ते अगदी  मिळते जुळते असतात.  कदाचित हे स्वभाव पुण्यातल्या इतर  पेठातील रहिवाशांमध्ये  अभावानेच आढळत असतील आणि त्यामुळेच पेठ सदाशिव महाराष्ट्रातच नव्हे तर जगातील सर्व मराठी बांधवांच्यात   ख्यातकीर्त  झाली असावी असे वाटते.


मी भाग्यवान, माझा जन्मच मुळी सदाशिव पेठेत  झाला. आता त्या वेळेला न कळत्या वयात आपण सदाशिव पेठेत जन्मलो ह्याचं अप्रूप अजिबातच नव्हत.  ते अप्रूप  मोठे झाल्यावर इतरांनी जाणवून दिलं आणि मग कळल की आपला जन्म आणि नंतर चाळिशीपर्यंत  सदाशिव पेठेत वाढणं  हे किती महत्त्वाचं होतं ते.


लहानपणापासून जवळ जवळ महाविद्यालयात  जाईपर्यंत  आजूबाजूचे भवताल तुमच्यावर खूप संस्कार करते, त्यातील तुमची शाळा ही महत्त्वाची पण त्याचबरोबर तुमच्या राहण्याच्या  आसमंतात कोण राहतं हे पण महत्वाचे. माझ्या जडणघडणीच्या काळात म्हणजे साधारण १९६० ते १९८० या काळात आजूबाजूला पुण्यातील  महत्त्वाच्या व्यक्ती राहत असत अर्थात आम्हाला त्याची तेव्हा जाणीव नव्हती  कारण ही मंडळी मोठी असली तरीसुद्धा दररोजच भेटत असल्यामुळे त्यांच्याबद्दल वेगळे काही जाणवत नसे पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आमच्यावर झाल्याशिवाय राहिला नाही




स्वगत

नेहमीप्रमाणे सकाळचे आठ वाजले होते , अगदी काल वाजले तसे किंवा उद्या वाजतील तसे. केकाटणाऱ्या सिलोन वर पद्मिनी   परेराने आपल्या नाजूक आणि आर्...