महाविद्यालयात असताना आणि नंतरही काही दिवस मी कविता करत असे. कवितांची ही डायरी मला जवळजवळ चाळीस वर्षांनी अचानकच सापडली. त्यातली ही एक शेवटची कविता. १९७९ साली लिहलेली. ह्या कवितेची पार्श्वभूमी अशी की मी मुंबईला नोकरीला लागलो होतो. भावाकडं डोंबिवलीला राहात असे. सकाळी सात वाजता निघालं घरून की संध्याकाळी घरी यायला साडेसात वाजत. निघताना पण मी पेंगुळलेला असे आणि येताना पण. मला आश्चर्य वाटायचं ही मुंबईची माणसं कशी काय जगतात, एवढ्या अवघड परिस्थितीत? एक प्रकारचं नैराश्य कायम भोवताली असायचं; त्यातूनच ही कविता स्फूरली असावी::
दिवसेंदिवस
उगवतीचा आणि मावळतीचा सुद्धा,
सूर्य मी कधीच बघत नाही.
माझ्या सोबतीला असतो तो भर
माध्यान्हीचा सूर्य. स्वतःच्या अस्तित्वाची
प्रकर्षाने जाणीव करून देणारा.
झोपलेल्या सूर्याच्या अगोदर मी
चालू लागतो, पेंगुळलेली पहाटेची
स्वप्न दाराआड ठेवून थेट.
इकडं तिकडं न बघता.
आणि संध्याकाळच्या रंगांची धमाल
संपल्यावर मी येतो.
खाडीवरच्या मासेमारी होडयांचे
दिसेनासे होणारे दिवे पहात व
धुंद(?) खारा वारा अंगावर घेत..
घरी ठेवलेली ती पहाटेची स्वप्ने
येऊ पाहतात डोळ्यांवर.
तुझीही आठवण होते.
गालांवरचा तांबडा जल्लोष आणि
मग अनुक्रमे येणाऱ्या आठवणी
मांडणीवरच्या जुन्या भांड्यांवरील
नावाप्रमाणे दिवसागणिक अंधुक होत जातात.
निदान तस वाटत तरी.
पण ती चकचकणारी भांडी मनात
शाबूत असतात. अगदी काळ निरपेक्ष.
मी निघतो. पुन्हा एकदा ती पहाटेची
भन्नाट स्वप्न दाराआड करुन.
फक्त माध्यान्हीचा सूर्य बघण्यासाठी.
जयंत पानसे
१ मे १९७९
कविता तू करतोस हे माहीत नव्हते मला..तू ते आयुष्य खूपच miss करतोय
ReplyDelete